लेखणी नव्या माधवीची
मुंबईत उभ्या भारताचं दर्शन घडतं असं आपण उगाच म्हणत नाही. इथे विविध भाषा बोलणारे लोक राहतात. इथल्या वातावरणाशी एकरूप होऊनही स्वतःचं वेगळेपण टिकवण्याचा प्रयत्न करत राहतात. वर्षानुवर्षं (अनेकदा पिढ्यानपिढ्या) मुंबईत काढूनही आपली भाषा शक्य तेवढी टिकवण्याचा, तिच्याशी असलेलं नातं जोपासण्याचा प्रयत्न मनापासून ते करतात. पुदीयमाधवी या नावाने तामीळमधून लेखन करणारी लेखिका अशांपैकीच एक. या शहरातली तिची चौथी पिढी. त्यामुळे मुंबईतलं जगणं ती अगदी जवळून ओळखते. तिच्या अनेक कविता अन् कथांमधून मुंबईतल्या जीवनाची झलक पसरलेली आहे. तीनेक कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, समीक्षात्मक लिखाणाची दोन पुस्तकं आणि वैचारिक लेखनाचा संग्रह असं वेगवेगळ्या तऱ्हेचं तिचं लिखाण पुस्तकरूपात आलं आहे. दैनिकं व नियतकालिकांमधून तिचं लेखन कधी स्तंभरूपाने तर कधी स्वतंत्र लेखांच्या रूपाने चालूच असतं. राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याची संधी असूनही जाणीवपूर्वक ती दूर राहिला आहे, मात्र तिची ठाम अशी राजकीय मतं आहेत. आपलं अभिव्यक्तिस्वातंत्र्य गमावून राजकारणात उतरण्याची तिची इच्छा नाही. कारण आपली मतं मांडण्याबाबत ती खूप आग्रही आहे आणि अशी वृत्ती राजकीय क्षेत्रात चालत नाही हा तिचा अनुभव आहे.
मुंबईत सुरुवातीचं बालपण गेल्यानंतर आठवीत असताना तिची रवानगी आधी मदुराईजवळच्या गावी आणि नंतर मदुराईतल्या शाळेत झाली. कॉलेज शिक्षणही तिथेच पार पडलं. त्यानंतर मात्र नोकरीच्या निमित्ताने ती मुंबईत आली ती इथेच स्थिरावली. असं असलं तरी बालपणीही दर सुट्टीत माधवी आणि तिच्या पाचही बहिणी मुंबईत येतच असत, कारण आईवडील इथेच राहत होते. वचील वल्लीनायकम हे सरकारी नोकरीत असले तरी राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. धारावीतल्या त्यांच्या घरात सतत कार्यकर्त्यांची ऊठबस, वेळीअवेळी होणारा त्यांचा वावर याचा परिणाम मुलींवर व्हायला नको म्हणून मुलींना त्यांनी आपल्या गावीच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सुटीच्या काळात मात्र त्यांना घरी यायला मिळे. वल्लीनायकन हे मुंबईतल्या दलित तामीळ समाजासाठी काम करण्याच्या ध्यासातून राजकीय-सामाजिक चळवळीत उतरले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही ते भेटले होते. आपल्या देशाला राजकीय स्वातंत्र्यापूर्वी सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याची गरज आहे असं त्यांचं मत होतं. स्वातंत्र्यानंतर सत्ताकारणाचाच प्रभाव राहील आणि विशिष्ट वर्गाचाच लाभ होईल अशी त्यांची धारणा होती. वडिलांमुळे माधवीला समाजातल्या विसंगती, विरोधाभास आणि समस्या यांचं भान आलं. घरात चालणाऱ्या चर्चा, वादसंवाद आणि चळवळविषयक साहित्य न्याहळत ती मोठी झाली. सातवीत असेपर्यंत ती मुंबईतच होती, त्या संस्कारक्षम वयात तिला या गोष्टींची जाणीव होत गेली…..
लहान वयापासूनच सामाजाबद्दलचं एक भान मनात जागं झालेल्या पुदीयमाधवी या लेखिकेला भांडुप इथल्या तिच्या घरीच भेटले. मूळ नाव मल्लिका असलेल्या या लेखिकेने पुदीयमाधवी (म्हणजे नवी माधवी) या नावाने लिहायला सुरुवात केली त्यामागे तसा काही हेतू नव्हता. मासिकाच्या प्रकाशकाने विचारलं की कोणत्या नावाने हे छापायचं, तेव्हा एकदम तिला वाटलं की हे नाव घेऊया आणि तिने तेच पुढे कायम ठेवलं. जिच्यावरून हे नाव घेतलं गेलं ती माधवी ही व्यक्तिरेखा एका तामीळ कथेत येते. शिवाय तामीळनाडूत माधवी नावाची एक वेल आहे, जी कोणत्याही परिस्थितीत चिवटपणे तगून राहते.
सजगपणे अवतीभवतीच्या वास्तवाकडे पाहणाऱ्या माधवीशी झालेली हा बातचीत-
पुदीयमाधवी हे नाव धारण करण्यामागे खास असं कारण आहे का? या नावामागची पार्श्वभूमी सांगाल?
माधवी ही एक वेलविशेष आहेच, पण माधवी नावाची एक व्यक्तिरेखा शिलपतिकारम या तामीळ महाकाव्यात आहे. तिच्याभोवती असलेली कथा वेगळीच आहे. मध्यमवर्गीय व्यावसायिक कुटुंबातलं कोवलन आणि कन्नगी हे जोडपं तामीळनाडूतल्या पुकार या बंदरात सुखाने कालक्रमणा करत असतं. एकदा एका कार्यक्रमात माधवी नावाची कलावंतीण नृत्य सादर करते, जिच्यावर कोवलन भाळतो. तो माधवीच्या आईला पैसे देऊन तिला विकत घेतो. आपल्या पत्नीला विसरून जाऊन कोवलन माधवीसोबत राहू लागतो. व्यवसायाकडे दुर्लक्ष करून कफल्लक बनतो. त्यांना एक कन्याही होते. एक दिवस समुद्रकिनारी दोघेही गात असतात. कोवलन कावेरी नदीचं स्तवन गातो, तर ते ऐकून माधवी आपल्या गाण्यातून राजाची स्तुती करते. पण कोवलनला नाटतं की ती परपुरुषाच्या प्रेमात आहे. म्हणून तो रागावतो आणि कन्नगीकडे परत जातो. तिथून दोघे मदुराईला निघतात. तिथे पत्नीचे पैंजण विकण्यासाठी तो सोनाराकडे जातो. सोनाराने राणीचे पैंजण हडप केले असतात, म्हणून तो य चोरीत कोवलनला अडकवतो. त्याला फाशीची शिक्षा होते. कन्नगीला याबद्दल कळतं तेव्हा ती राजाकडे जाते आणि सत्य सांगते. राजाला पश्चात्ताप होतो, आणि तो दक्क्याने मरण पावतो. कन्नगी अग्निदेवतेची प्रर्थना करून मदुराई शहर भस्मसात करण्याची विनंती त्याला करते. आज कन्नगीची पूजा संपूर्ण दक्षिणभआरतात केल जाते. तिकडे माधवीला सारं समजल्यावर ती घरदार सोडून देऊन मुलीसह बुद्धधर्माचा स्वीकार करते. तिची मुलगी मणिमेखला हिचीही एक वेगळच कहाणी तामीळ साहित्यात आहे.
मी माधवीचं नाव घेतलं ते यासाठी की माधवी ही पहिली अशी महिला आहे जी कौटुंबिक वर्तुळातून बाहेर पडली आणि स्वतःचा स्वतंत्र मार्ग तिने निवडला. ती सामाजिक प्रवाहात शिरली. मी तिचं नाव घेतलं ते माझ्या प्रकाशकाने रेल्वेत झालेल्या धावत्या भेटीत मला कोणत्या नावाने तुझं लिखाण छापू, असं अचानक विचारलं तेव्हा..सहज मनात आलं आपण माधवी नावाने लिहावं. एक अनामिकता लिहिताना बरी वाटतेच…पण आजही एखादा कॉलेजातला प्रोफेसर मला विचारतो, तू त्यानाचणारीचं नाव का घेतलंस, कन्नगीचं का नाही. खरं तर त्याला विचारायचं असतं, एका वेश्येचं नाव का घेतलंस? अशा तऱ्हेचे शेरे ऐकल्यावर पुदीयमाधवी हे नावच कायम ठेवायचं हे मी पक्कं करून टाकलं….
माधवी, तुम्ही या मुंबई शहराचं एक निराळं रूप अनुभवलं आहे. आज धारावीचा परिसर फारच गजबजलेला आहे, तसाच तेव्हाही असेल. पण एकूण वातावरण कसं होतं तेव्हाचं? आणि तामीळ लोक पूर्वीपासूनच तिथे मोठ्या प्रमाणावर राहत होते का?
आम्ही राहत होतो तेव्हाची आणि आताची धारावी यात खूपच अंतर आहे. त्यावेळीही गर्दी होतीच तिथे, पण आता ती फारच वाढली आहे. धारावीत जागा घेणं आज शक्य होणार नाही इतकी किंमत आली आहे त्या जागेला. कारण सध्याचं पुनर्विकासाचं धोरण. आमचं कुटुंब धारावीत होतं तेव्हा हा भाग तस खूपच शांत होता. खरंतर कामगार, मजूर आणि सरकारी नोकरीत असलेले निम्नमध्यमवर्गीय यांचा हा भाग. दक्षिणेतले, विशेषतः तामीळनाडूतले अनेक मजूर मुंबईत आले की धारावीत राहत. ब्रिटिश काळातच याची सुरुवात झाली. इथल्या टॅनरीत काम करण्यासाठी तामीळनाडूतले लोक येत. मग रेल्वेचं वर्कशॉप, बंदरं, अशा ठिकाणी मजूर-कामगार लागत तेव्हा तामीळ लोक मोठ्या प्रमाणात येऊ लागले. इथे रोजगार होता ना….
आमचं कुटुंब तसं फार पूर्वीपासून मुंबईत आलं होतं. माझी चौथी पिढी आहे इथली. आमची परिस्थिती ठीकठाक होती. पुढे इथून आम्ही इथून अँटॉप हिल भागात गेलो. ते तसं बरंच नंतर. इथे होतो तेव्हा धारावीत चक्क समुद्रकिनारा होता, हे आज कुणाला खरं वाटणार नाही. आम्ही मुलं रोज तिथल्या वाळूत खेळत असू. मजा यायची खूप. आता सारंच बदललं आहे. आज जिथे धारावी-बांद्रा लिंक रोड आहे तिथे हा समुद्र होता.
तुम्ही शिक्षणासाठी मदुराईला होता, तिथले दिवस कसे होते? मुंबई आणि मदुराई असा फरक जाणवायचा का?
तिथले आमचे दिवस छान होते. आम्ही सहा बहिणी आणि एक भाऊ. वडील चळवळीत सक्रिय होते. घरात खूप राबता असायचा कार्यकर्त्यांचा, कामगारांचा. अनेक नेतेही घरी येत. त्याचा एक निराळाच संस्कार आमच्यावर झाला. निदान माझ्यावर तरी. म्हणजे मी समाजाचा विचार करू लागले, वाचू लागले वगैरे. पुढे लिहूही लागले. घरात माझ्या भावंडांपैकी कुणीही या क्षेत्राकडे वळलं नाही. काय असेल ते असो, पण वडिलांना वाटलं असावं की मुलींना या वातावरणापासून थोडं लांब ठेवायला हवं, त्यांना सुरळीतपणे अभ्यास करता यायल हवा. कदाचित अशा प्रकारे वेगवेगळे लोक घरी येत असल्याने मुलींना कुणाचं आकर्षण वगैरे वाटलं तर…असा विचारही त्यांनी केला असावा असं आज मला वाटतं. त्यांना आपलं काम सोडायचं नव्हतं म्हणून त्यांनी हा मार्ग काढला असावा. माहीत नाही…
मला पहिल्यांदा एक वर्ष माझ्या आजोळी ठेवलं होतं. नंतर मदुराईतल्या शाळेत प्रवेश मिळाला आणि मी तिथे हॉस्टेलवर राहू लागले. हॉस्टेलचं जीवन खूप शिस्तबद्ध आणि कडक. रोमन कॅथलिक चर्चची शाळा आणि हॉस्टेल होतं ते. पहाटे पाच वाजता प्रार्तना व्हायची. तिकडे आमच्या घरात देव आहे की नाही, यावर वाद झडायचे आणि तो नाही, यावर बहुतेक जण अनुकूल असायचे आणि शाळेत उलटी स्थिती. प्रार्थनेविना जेवणही होत नसे आमचं. हा विरोधाभास होता, पण तो अंगवळणी पडत गेला. सुटी संपली की वडील आमची तिकिटं आणि सोबतीला कुणाला तरी पाठवायचे. सुटी संपताना तीच तऱ्हा, आमची वरात याच थाटात मदुराईला परतायची. घरी खूप मजा करायचो आम्ही साऱ्या बहिणी…
शाळेतही मला आवडायचं. गोष्टीची पुस्तकं वाचायची, गाणी म्हणायची आणि नाटकातून काम करायचं असं बरंच तिथे होतं. एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिविटीज् भरपूर होत्या.मुंबईतएवढं मिळालं असतं की नाही कोण जाणे. माझ्या मुलांना तरी नाही मिळाल्या पुढच्या काळात. माझं खरं वाचन मात्र कॉलेजात गेल्यावरच सुरू झालं. त्यापूर्वी साहित्यकृतींपेक्षा इतर वैचारिक लेखनच मी जास्त वाचलं होतं. वडिलांकडे तसलं साहित्य भरपूर असायचं ना.. जयकान्तन हे माझे सर्वात आवडते कथाकार. कल्कींच्या कादंबऱ्याही मी वाचे, पण जयकान्तन जास्त आवडत. तसंच आर के नारायण यांचं नाव तेव्हा गाजत होतं. मला त्यांचं लिखाण आवडायचं, पण त्यातलं ग्रामीण वातावरण फार कौतुकाचं वाटलं नाही, कारण मी स्वतःच गावातल्या जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला होता ना….दुसरे महत्त्वाचे कथालेखक म्हणजे पुदुमै पित्तन. तामीळमधले ते सर्वोत्कृष्ट कथाकार आहेत असं माझं मत आहे.
तुम्ही लिहायला कशी सुरुवात केलीत? कवितांनी साधारणपणे प्रत्येकजण लिहायला सुरुवात करतो…
माझी सुरुवाही मात्र कथेने झाली. तरी पुढे मी कविताच जास्त लिहीत होते. दरम्यान मी मुंबईत येऊन एचएसबीसी मध्ये नोकरी करत होते. बँकेतली नोकरी सांभाळून लिखाण वगैरे करण्याचा विचारही फारसा करायला मिळत नव्हता. माझ्या लग्नानंतर, 1982 पासून मी डोंबिवलीत राहू लागले. तिथून फोर्टमधलं ऑफीस गाठणं हाच मोठा व्याप असायचा. बँकेत मी बावीस वर्षं राहिले. स्वेच्छा निवृत्ती आल्यावर लगेच राजीनामा दिला.
तरी त्याही काळात कधी कविता वगैरे लिहीत असे…पण फार लिहीत नव्हते. समोर विषय खूप असायचे. रोजच्या प्रवासातच अगणित कहाण्या दिसायच्या. वाटायचं आपण लिहायला हवं. पण रोजच्या धावपळीत त्याकडे दुर्लक्षच व्हायचं.
एकदा एका तामीळ मासिकाचा संपादक माझ्या मागेच लागला की लिहाच काहीतरी. नेहमी भेटायचा आणि आग्रह करायचा. मग मीही ठरलं काही लिहायला हवं. गाडीतच मग लिहायची काहीतरी. माझं लिखाण मी कधी जपून ठेवतही नव्हते. माझं लेखन कंपोझ करणारा एक कॉपी माझ्यासाठीही करून ठेवायचा. त्याने व्यवस्थित फाईल बनवली होती. तोच पुढे मागे लागला की पुस्तक करा. तेव्हा मी म्हटलं की माझ्याकडे लिखाण आहे कुठे… मग त्याने ती फाईल दाखवली मला.
कविता तर मी लिहीतच होते. पण मुंबईतल्या जीवनावर कथात्मक लिखाण असंच एका साप्ताहिकासाठी केलं. रूम फॉर यू. मुंबईसारख्या शहरात प्रत्येकाला एक स्पेस हवी असते, ती त्याला मिळत नाही, त्यामुळे आयुष्यात अनेक प्रश्न उभे राहतात. या सूत्राला धरून मी कथावजा लिखाण करत गेले. दर आठवड्याला एक याप्रमाणे सलग पंचवीस कथा लिहिल्या. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. मुंबईत स्वतःची स्पेस मिळणं, स्वतःचा एक कोपरा मिळणं ही कठीण गोष्ट झाली आहे. असा कोपरा आवश्यक असतो, मानसिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक बाबी त्यावर अवलंबून असतात. ‘तनिआरे’ म्हणजे सेपरेट रूम. हा माझा ‘तामिल पोस्ट’मधला स्तंभ लोकांना खूप आवडला, अनेकदा कुणी फोन करून विचारत असे, माझी ही गोष्ट तुला कशी कळली? खरंतर तसं काही नसायचं, पण इथल्या जगण्याचं प्रतिबिंब या लिखाणात पडल्याने कुणाची ना कुणाची ती गोष्ट असायचीच. हे लेखन मी अगदी सहजतेने केलं. हातात लेखणी घेतली की ठरवलं नसतानाही विषय सुचायचा आणि मी झर्रकन लिहून टाकायचे. मला पक्त दोन पानं दिली होती, त्यात सारं बसवायचं असे. पण त्यामुळे ते छान चौकटबद्ध, नेमकं लिखाण झालं. माझ्या ओळखीच्या अमेरिकेत राहणाऱ्या एकाने अमेरिकन युनिवर्सिटीत या कथा अनुवादित करून पाठवल्या. तिथल्या ब्लॅक अमेरिकन लोकांमध्येही ही समस्या आहेच. तिथल्या जीवनाशी मिळतं जुळतं वातावरण असल्याने तिथेही त्या अपील झाल्या.
तुमच्या कवितांमध्येही मुंबईतलं जीवन, सार्वजनिक आणि खासगी आयुष्यातल्या स्त्रियांच्या समस्या यांचं प्रतिबिंब सापडतं. एरवी प्रासंगिक लिखाण करतानाही तुम्ही अनेक सामाजिक किंवा राजकीय प्रश्न हाताळता. कथा-कविता आणि अशा तऱ्हेचं लिखाण यात काय फरक जाणवतो? कुठलं लिखाण तुम्हाला अधिक जवळचं वाटतं?
दोन्ही ठिकाणी मीच असते. त्यामुळे सांगणं कठीण आहे. पण एक आहे, माझ्या लेखांमधून मी लिहिते ती थेट माझी मतं, माझे विचार असतात. मी जोरदारपणे ते मांडू शकते. हा फरक काही कमी महत्त्वाचा नाही. अभ्यास आणि संशोधन करून मी हे लेख लिहिते. मग काश्मिरचा विषय असो की रामसेतूचा किंवा द्रविड चळवळीचा.
लेखन करताना अत्यंत मोकळेपणाने आपल्याला लिहिता येतं असं वाटतं का? अनेक अगदी स्त्रीवादी लेखिकांनीही एक अदृश्य अडसर जाणवतो हे कबूल केलं आहे. तुमच्याबाबत काय म्हणता येईल?
करं आहे. अनेकजणी हे कबूल करतात, तर काही कबूल करत नाहीत एवढाच फरक. मला तर वाटतं की प्रत्येकच स्त्रीला लिहिताना ही समस्या जाणवतेच जाणवते. तिल कसं हाताळायचं हे महत्त्वाचं असतं. याचे प्रत्येकीचे वेगळे मार्ग असू शकतात. स्त्रीवादाबद्दल मला विचाराल तर स्त्रीवाद मला मान्य आहे. पण पाश्चिमात्य देशांमधील स्त्रीवादाचं अंधानुकरण मला रुचत नाही. आपल्याकडली परिस्थिती वेगळी आहे. तिथे तिकडल्या फूटपट्ट्या लावून कसं चालेल? स्त्री-पुरुषांच्या संदर्भात बोलायचं तर दोघेही एकमेकापेक्षा काही बाबतीत वेगळे आहेत असं मी म्हणेन. पण यामुळे पुरुष वरचढ आणि स्त्री गौण ठरते असं मी मानत नाही. हाच माझा फेमिनिझम आहे.
आता यापुढे नवीन लेखनाचा काय संकल्प आहे? सध्या तुम्ही ब्लॉगही लिहीत असता… कवितांचा इंग्रजी अनुवाद त्यावर टाकलाय हे बरं झालं.. इतर भाषकांना वाचता येतात.
माझं ब्लॉगलेखन तसं दोनेक वर्षांपासून चालू आहे. पण मुख्यतः तामीळमधून. माझं बहुतेक स्फुट लेखन मी त्यावर टाकत असते. मुंबई सिरीजमधल्या इंग्रजी कविताही आहेत त्यावर.
स्वतंत्र प्रकल्प म्हणाल तर आता एक कादंबरी लिहितेय. चार मुली हॉस्टेलवर राहून मोठ्या होतात आणि आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावतात. त्यांची त्याकाळातली हॉस्टेलची मेट्रन आणि एकमेकीच्या संपर्कात असलेल्या या चार मैत्रिणी यांची ही कहाणी आहे.
म्हणजे तुमच्या स्वतःच्या हॉस्टेल लाईफची झलकही येणार त्यात…
अगदी बरोबर. ती तर येणारच. पण इतरही बरंच काही असेल. थोडंच लेखन झालंय. पण आता त्यावरच भर देणार म्हणते….
तुमचा संबंध राजकीय आणि सामाजिक वर्तुळाशी पूर्वीपासून राहिला आहे. वेगवेगळ्या मंचांवरून तुम्ही सामाजिक कामात सहभागी होता. तर तुम्ही राजकारणात अजून प्रवेश कसा नाही केलात? या क्षेत्रात शिरावं असं वाटलं नाही कधी?
मला सहज प्रवेश मिळाला असता राजकारणात. माझे वडील याच क्षेत्रातले ना. इथल्या डीएमकेचे ते संस्थापक सदस्यच आहेत. मी राजकारणात आले तर लोकांना हवंच होतं. पण मला राजकारणातल्या अनेक गोष्टी रुचत नाहीत. पचनीच पडत नाहीत. मी स्पष्टवक्ती आहे आणि राजकीय व्यक्तींना स्पष्ट बोललेलं आवडत नाही. मी टीका करते ते त्यांच्या पाठिराख्यांनाही पटत नाही. करुणानिधी हे तर डीएमकेचे सर्वेसर्वा. पण मी त्यांच्याही विरुद्ध बोलते. त्यांची राजकीय विचारसरणी आणि कृती यात अंतर आहे असं मी एकदा म्हटलं, ते आवडलं नाही लोकांना. असं राजकारणात चालत नाही. ही मुलगी काहीही बोलते असं त्यांना वाटतं. सहन होत नाही. आपण आपलं लांबच बरं.
माझ्या लेखनातूनही मी भरपूर टीका करते. तिथले लोक काहीच आवाज कसा उठवत नाहीत असं मी म्हणते तेव्हा तामीळनाडूतले परिचित व मित्र म्हणतात, तू तिकडे मुंबईत बसून वाटेल ते लिहू शकतेस. इथे ये आणि लिही. तुला लिहिताच योणार नाही. तेही आपल्या जागी ठीकच म्हणायचे. त्यापेक्षा आपलं हे क्षेत्र बरं.
सध्या तामीळमधल्या प्रकाशन क्षेत्राची आणि एकूणच भाषाविषयक स्थिती कशी आहे? तुमच्या स्वतःच्या घरात मुलांचा तामीळशी संबंध कसा राहिला आहे?
खरं सांगायचं तर स्थिती वाईट आहे. इतर भाषांसारखीच. प्रकाशक नवीन लेखकाच्या पुस्तकाला पैशावाचून हात लावायला तयार नाहीत. आमच्यासारख्या किंवा अगदी नामांकित लेखकालाही रॉयल्टी मिळणं मुश्किल असतं. म्हणजे मिळतच नाही. असं चाललं आहे. माझी पुस्तकं ग्रंथालयांमधून घेतली जातात म्हणून प्रसिद्ध होतात. भाषेकडे लोक दुर्लक्षच करत आहेत. त्यांची तरी काय चूक…माझ्या मुलीला तामीळ येतं. पण मुलाला येत नाही. त्याला त्यात रस नाही. मुलगीही अमेरिकेत गेली होती. पुढे लग्नानंतर तिथेच स्थायिक झाली आहे. मला ते आवडत नाही. पण ती म्हणते, इट्स माय लाईफ. तिचंही बरोबरच आहे.
आज भाषांचं भवितव्य कठीण बनत चाललं आहे त्यामागे अनेक कारणं आहेत. जागतिकीकरणामुळे माणूस स्वतःच्या भूमीपासून, संस्कृतीपासून दूर जातो. आंतरजातीय विवाह हेसुद्धा भाषेला मारक ठरतात. मी त्यांच्या विरोधात नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. अशा घरांमध्ये अनेकदा दोघांच्याही मातृभाषा बाजूला पडताना दिसतात. शिवाय पालकांकडेही मुलांना भाषेबाबतचं भान न दिल्याचा दोष जातो असं मला वाटतं.
आता माधवीने आपल्या लेखनात, सामाजिक कामात मन गुंतवलं आहे. यापूर्वी, साहित्यिक आणि सास्कृतिक मंचांसोबतच तिने सेरी (कँपेन फॉर इलेक्टोरल रिफॉर्म्स इन इंडिया)सारख्या निवडणूक सुधारणा कार्यक्रमावर काम करणाऱ्या संस्थेतही काम केलंय. पॅरीसमधील दलित परिषद, बांगला देशातील सेरीचा प्रकल्प अशा मंचांवर जाऊन आपली मतं मांडण्याची संधी तिला मिळाली आहे.
माधवीचं फारच थोडं लेखन मराठी वाचकांसाठी उपलब्ध आहे. काही कवित आणि कथा इंग्रजीतून उपलब्ध आहेत तेवढ्याच. महानगर कवितांमधून तिने घडवलेलं मुंबईतल्या जगण्याचं दर्शन, हे राम सारख्या कवितेतून तिने मांडलेला धर्माचा मुद्दा, माय डिअर डॉटर कवितेत उमटलेली तिच्यातील आईची व्यथा यातून माधवीच्या काव्याची झलक वाटायला मिळते. पारंपरिकतेमधील अन्यायाबाबत, स्त्रीला मिळणाऱ्या वागणुकीबाबत ती परखडपणे लिहिते. आपल्या ‘लॉक्स अँड कीज्’ या कवितेत ती म्हणते,
I have lost my keys
The century old keys
Searching everywhere
आपल्या लिखाणाची किल्ली मात्र तिने हातात घट्ट धरून ठेवली आहे.
नंदिनी आत्मसिद्ध
सी-३, गुलमोहर, महापालिका वसाहत,